तुमच्या नोंदी
गाभोळीचे मासे
आमचे कॅलेंडर जे मासे विणीच्या हंगामात असतात त्यांना खाण्याचे टाळा असे “सुचवते. त्यामुळे आमच्या कॅलेंडर मध्ये एखादा मासा “टाळा” विभागात नसेल तर बहुतांशी तो विणीच्या हंगामात नसतो. असे असून सुद्धा अनेक वेळा लोकांनी आम्हाला असा प्रश्न विचारला आहे कि “आम्ही तर कॅलेंडर बघून मासे आणले. पण ते चिरल्यावर त्यात गाभोळी निघाली, असे कसे?
असे ३ मुख्य कारणांमुळे होऊ शकते. प्रथमतः काही माशांची विण वर्षभर होते. तर काही माशांचे विणीचे हंगाम हवामान बदलामुळे बदललेले असण्याचासुद्धा संभव आहे. (ह्याबद्दल अधिक माहितीसाठी आमचा वारंवार विचारले जाणारे प्रश्न विभाग बघा)
पण माशांच्या विणीच्या हंगामाच्या संपूर्ण माहितीची अनुपलब्धता हेच अशा विसंगतीचे मुख्य कारण आहे. आमचे कॅलेंडर माहिती छापील स्वरूपात उपलब्ध असण्यावर अवलंबून आहे. जर एखाद्या माशाच्या विणीच्या हंगामाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसेल तर आमचे कॅलेंडर अचूकपणे तो मासा खा कि टाळा ते सुचवू शकत नाही. अशा वेळी आम्ही दिलेला विणीचा हंगाम आणि लोकांच्या लक्षात आलेले माशाच्या गाभोळीचे महिने ह्यामध्ये विसंगतता असू शकते.
पण अशा वेळी तुम्ही आम्हाला मदत करू शकता. त्यासाठीच आम्ही हा गाभोळीचे मासे प्रकल्प किंवा FISH WITH EGGS PROJECT सुरु करीत आहोत.
जर तुम्हाला तुम्ही आणलेल्या माशामध्ये अंडी आढळली तर तुम्ही त्याची नोंद ह्या गूगल फॉर्म मध्ये करू शकता. ह्या नोंदीला फार फार तर एखादे मिनिट लागेल. जर तुम्हाला विविध प्रकारच्या माशांमधील अंड्यांची नोंद करायची असेल तर प्रत्येक प्रकारच्या माशांसाठी वेगळी नोंद करा.
जर तुम्हाला तुमच्या नोंदी कुठे जमा होत आहेत ह्याची उत्सुकता असेल किंवा इतर लोकांच्या नोंदी वाचण्याची उत्सुकता असेल तर इथे क्लिक करा