top of page

Frequently Asked Questions (FAQs)

Q.

मासे खाणाऱ्या लोकांना विणीच्या हंगामानुसार मासे खायला सांगायच्या ऐवजी मच्छिमारांनाच विणीच्या हंगामात मासे पकडू नका, असे तुम्ही का सुचवत नाही?

A.

ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपण थोडा भारतातील मच्छिमारीचा इतिहास जाणून घ्यायला हवा.

 

भारताच्या स्वातंत्र्यानंतर, मत्स्यव्यवसाय उद्योगाकडे अन्न सुरक्षा, रोजगार आणि आर्थिक वाढीच्या समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता असलेले एक महत्त्वाचे उत्पादन क्षेत्र म्हणून पाहिले गेले. त्यामुळे सरकारने लोकांना मासेमारी करण्यास प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली. मासेमारीच्या विविध खर्चांवर जसे की बोटी बांधण्यासाठी लागणारा खर्च, इंधन, उपकरणे इत्यादींवर सबसिडी देऊन हे केले गेले. उत्पादन वाढवण्याच्या या प्रयत्नात, ट्रॉलिंगसारख्या विनाशकारी मासेमारी पद्धती सुरू केल्या गेल्या आणि त्यांना अनुदानही देण्यात आले.

 

1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात, किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसाय वाढणे थांबले आणि मासेमारीतून मिळणारा नफा कमी होऊ लागला. अनुदान ही मच्छीमारांना व्यवसायात ठेवणारी एकमेव गोष्ट होती. आणि त्यातूनच हे अनुदानाचे दुष्टचक्र निर्माण झाले. आज ४० लाख लोकांचा प्रमुख व्यवसाय मच्छिमारीशी संलग्न आहे. आणि वस्तुस्थिती अशी आहे कि मच्छिमारी हा व्यवसाय आता दिवाळखोरीच्या दारात उभा आहे. 

 

अशा परिस्थितीत कुठल्याही महिन्यात मच्छिमारीला सुट्टी देण्याएकवाढी आर्थिक क्षमता हल्ली मच्छीमारांमध्ये राहिली नाही. अशा परिस्थितीत मच्छिमारांना कुठलाही परताव्याची खात्री न देता  मंदीच्या काळात मासेमारी करण्याच्या पद्धतीत बदल करायला सांगणे अनुचित ठरू शकेल. 

 

अशा वेळी समुद्री परिसंस्था आणि मच्छिमारी वाचविण्यासाठी कोण योगदान देऊ शकेल ?

 

एक तर शासन. मच्छिमारीला ह्या अनुदानाच्या दुष्टचक्रातून सोडवण्यासाठी क्रमाक्रमाने धोरणात्मक बदल शासन करू शकते आणि आमचे काही सदस्य आणि इतर अनेक संशोधक विविध राज्यांच्या शासनाबरोबर हा प्रयत्न करीत आहेत. 

 

पण शासनाबरोबरच तुम्हा आम्हा सारखे सामान्य नागरिकही आपला खारीचा वाट उचलू शकतात. जर मासे त्यांच्या विणीच्या हंगामात पकडले जाऊ नये ह्या संबंधित प्रयत्न करायचे झाले तर ज्या माशांचा विणीचा हंगाम नाही अशा माशांना जर बाजारात मागणी असेल मच्छिमारही त्याप्रमाणे जाळी वापरू शकतील. ह्यामुळे विणीच्या हंगामातले मासे कमीत कमी मारले जातील. आपल्यासारखे ग्राहकांना केवळ मासे खाण्याच्या महिन्यांमध्ये बदल करायचा आहे. ते करून आपण मच्छिमार आणि शासन दोघांचीही मदत करू शकतो. हाच विचार करून आम्ही हे कॅलेंडर बनविलेले आहे.

Q.

मत्स्यशेतीमध्ये वाढविलेली कोलंबी / चिंगूळ खाणे योग्य आहे काय?

A.

कोलंबी / चिंगूळ हे अत्यंत विध्वंसक अशा ट्रॉलिंग मध्ये पकडले जातात. त्यांच्याबरोबरच इतर अनेक मासे सुद्धा पकडले जातात. ह्यांना बाजारात भाव नसल्यामुळे त्याची केवळ नासाडी होते. ह्याचबरोबर ट्रॉलिंगमुळे समुद्रतळ खारवादाला जातो आणि अनेक माशांचा अधिवास नष्ट होतो. 

 

अशा वेळी मत्स्यशेतीमध्ये वाढविलेली कोलंबी / चिंगूळ हे चांगला पर्याय वाटू शकतात. पण मत्स्यशेतीमध्ये कोलंबी / चिंगूळ वाढवायला त्यांना खाणे द्यावे लागते आणि हे खाणे प्रामुख्याने ट्रॉलिंगमध्ये पकडले गेलेले इतर मासे असतात किंवा असे स्वस्त मासे असतात कि जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांचा आहार होऊ शकतात. त्यामुळे मत्स्यशेतीमध्ये वाढविलेली कोलंबी / चिंगूळ ट्रॉलिंग कमी करण्यास मदत करत नाही तर त्याला प्रोत्साहनच ठरते. त्यामुळे जो पर्यंत समुद्रापासून येणाऱ्या खांद्याला मत्स्यशेतीमध्ये चांगले पर्याय उपलध्द होत नाहीत तोपर्यंत मत्स्यशेतीमध्ये वाढविलेली कोलंबी / चिंगूळ खाणे समुद्री परिसंस्थेसाठी आणि मच्छिमारी साठी हानिकारक ठरते.

Q.

मी एकट्याने माझ्या माशांच्या निवडीत बदल केल्यामुळे काय फरक पडणार आहे?

A.

ह्या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी आपण लसीकरणाचे उदाहरण घेऊ. लस घेणे हा ऐच्छिक विषय आहे. एका माणसाने लस घेऊन रोगाची साथ कमी होणार नाही. पण एकाने लस घेतली कि त्याच्या/तिच्या जवळचे लोक त्यांच्याशी लसीकरणाबद्दल बोलतात. त्यातून त्यांना एकाच्या अनुभवावरून लसीबद्दल खात्री वाटते आणि ते सुद्धा लस घेतात. आणि त्यांचे बघून त्यांच्या जवळची माणसे सुद्धा लस घेतात. अशा प्रकारे लस घेतलेल्या माणसांची संख्या वाढायला लागते आणि रोगाच्या साथीचा जोर कमी व्हायला लागतो. 

 

जबाबदारीपूर्वक मासे खाण्याचे सुद्धा असेच आहे. हा ऐच्छिक विषय आहे. एकाने जबाबदारीपूर्वक मासे खाल्ले / कॅलेंडर वापरले तर काही लगेच अतिरिक्त मच्छिमारी कमी होणार नाही. पण त्या एकाचे बघून चार लोकांना प्रेरणा मिळते. आणि चारांचे बघून सोळा लोक कॅलेंडर वापरू लागलीत. जसे कॅलेंडर वापरणारे लोक वाढू लागतील तसे माशांच्या मागणीवर होणार परिणाम सुद्धा दिसून येऊ लागेल. 

 

म्हणून आमचा सल्ला असा कि तुम्ही सुरवात तर करा. स्वतःला कमी लेखू नका. अनेक लोक तुमचे अनेक बाबतीत अनुकरण करतात. ह्या बाबतीत सुद्धा करतील.

Q.

ग्राहकांच्या मागणीने मच्छिमारीवर खरंच फरक पडतो का?

A.

श्रावण महिन्याचेच उदाहरण घ्या. श्रावण महिन्यात आणि नंतर येणाऱ्या गणेश चतुर्थीमध्ये महाराष्ट्रातले बहुनांश हिंदू मासे खाणे टाळतात. ह्यामुळे ह्या महिन्यात माशांना फार भाव मिळत नाही. आणि म्हणूनच मच्छीमारांना सुद्धा ह्या महिन्यात खूप मासे पकडणे परवडत नाही. 

 

त्याउलट नवीन वर्षाच्या आणि नाताळाच्या वेळी माशांना खूपच मागणी असते. त्यामुळे मच्छिमार ह्या भरपूर मागणीच्या फायदा घेण्यासाठी विशेष करून समुद्रात जास्त फेऱ्या करतात. ह्या उदाहरणांमुळे हे लक्षात येते कि किती मासे पकडले जातात ह्यावर ग्राहकांच्या मागणीमुळे खूप फरक पडतो. 

 

आपण वैयक्तिक पातळीवर जीवनशैलीतील बदलांच्या सामर्थ्याला कमी लेखू नये. हे वाटते त्यापेक्षा जास्त परिणामकारक असू शकते. त्यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही हे कॅलेंडर बनविले आहे आणि त्याचा प्रसारही करत आहोत. आता त्यामुळे किती फरक पडेल हे तुम्ही ग्राहक म्हणून किती आत्मसात करू शकता यावर अवलंबून आहे. लक्षात ठेवा, अतिरिक्त मासेमारीला आला घालणे ही केवळ मच्छीमार, शास्त्रज्ञ, शासन ह्यांचीच जबाबदारी नाही तर ग्राहक म्हणूनही ती आपलीसुद्धा जबाबदारी आहे.

Q.

सगळे मासे पावसाळ्यात अंडी घालतात का? आपल्याकडे पावसाळ्यात मासेमारीवर बंदी का आहे?

A.

सगळे मासे पावसाळ्यात अंडी घालत नाहीत. कॅलेंडर बनवताना आमच्या असे लक्षात आले कि भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पकडल्या जाणाऱ्या ८६ माशांपैकी फक्त १७ मासे प्रामुख्याने पावसाळ्यात अंडी घालतात. 

 

पश्चिम किनारपट्टीवरील सर्वच राज्ये पावसाळ्यात मासेमारीवरील बंदी पाळतात. पण हि बंदी कोणाकोणाला लागू आहे ह्याबद्दलचे नियम प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत. १९८० च्या दशकामध्ये लहान व मोठे मच्छिमार ह्यांमधील तणाव दूर करण्यासाठी प्रामुख्याने मोट्या मच्छिमारीवर पावसाळ्यात बंदी घालण्यात आली. त्यामुळे हा नियम माशांना विणीच्या हंगामात संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेलाच नाही.

Q.

मासे खरेदी करताना लहान मासे खरेदी करावेत कि मोठे मासे खरेदी करावेत?

A.

हा प्रश्न जर २०१० च्या आधी विचारला असता तर आमचे उत्तर असे असते कि शक्यतो मोठे मासे खरेदी करावेत. लहान मासे मारले तर ते मोठे होऊन प्रजनन करू शकत नाहीत. आणि लहान माशांच्या मच्छिमारीमुळे मत्स्य दुष्काळ होण्याचा संभव असतो. तसे होऊ नये म्हणून आपण लहान मासे खरेदी करू नये आणि त्यांची बाजारातील मागणी कमी करावी. 

 

पण २०१० च्या दरम्यान मत्स्यकी शास्त्रात “बॅलेन्स हार्वेस्ट थेअरी” अथवा “संतुलित मासेमारी तत्व” ह्यावर बरेच संशोधन झाले. ह्या तत्वानुसार लहान माशांच्या मच्छिमारीचा माशांच्या संख्येवर आपणास वाटतो तेवढा विपरीत परिणाम होत नाही. मत्स्य विज्ञानात हा अजूनही वादग्रस्त विषय आहे आणि त्यावर एकमत नाही

 

पण ह्या नव्या सिद्धांताकडे संपूर्ण दुर्लक्ष करणेही योग्य नाही. म्हणूनच आम्ही आमचे कॅलेंडर बनवताना माशांच्या आकारमानापेक्षा त्यांच्या विणीच्या हंगामावर लक्ष केंद्रित केले आहे. 

 

मोरी आणि मुशी वर्गातल्या माशांबद्दल मात्र  आकारमान सुद्धा तितकेच महत्वाचे ठरते. ते कमी पिल्लाना जन्म देतात आणि त्यांची पिल्ले प्रौढ होण्यासही बराच वेळ घेतात. अशा वेळी हि पिल्ले मारली जाणे त्यांच्या एकूण संख्येसाठी अत्यंत विनाशकारक ठरते. ह्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही असे सुचवतो कि शक्यतो मोरी अथवा मुशी खाणे टाळा. आणि खायचेच असेल तर निदान लहान पिल्ले खाण्याचे टाळा.

Q.

बर्फात गोठवलेले मासे कोणत्याही महिन्यात खाता येतील का?

A.

मासा कुठल्या महिन्यात पकडला गेला ते जास्त महत्वाचे आहे. बरेच वेळा गोठवलेले मासे ज्या प्लास्टिक च्या आवरणातून मिळतात त्यावर हि माहिती लिहिलेली असते. तसे जर असेल तर तो महिना बघा आणि कॅलेंडर बघून ठरावा. जर ती माहिती नसेल तर शक्यतो असे मासे खाणे टाळणेच योग्य ठरते.

Q.

“आम्ही तर कॅलेंडर बघून “खाण्यास हरकत नाही” ह्या रकान्यात सुचविलेले मासे आणले. पण ते चिरल्यावर त्यात गाभोळी निघाली, असे कसे?

A.

हे तीन प्रमुख कारणांमुळे होऊ शकते. 

 

१. प्रथमतः काही माशांची विण वर्षभर होते. त्यामुळे लोकांना हे मासे वर्षभर खाऊ नका हे सांगणे व्यवहार्य नाही. त्यामुळे आम्ही ज्या महिन्यात ह्या माशांची वीण सर्वात जास्त होते त्या महिन्यात ते मासे खाऊ नका असे सुचवतो. जर तुम्ही ह्या माशांपैकी कुठला मासा आणला असेल तर केवळ योगायोगाने तुमच्या कडे विणीला  आलेला मासा आला आहे असे तुम्ही समजू शकता. 

 

२. काही माशांचे विणीचे हंगाम हवामान बदलामुळे बदललेले असण्याचासुद्धा संभव आहे. अशावेळी आमचे कॅलेंडर आणि तुम्हाला मिळालेला मासा ह्यात विसंगती असू शकते.

 

३. आमचे कॅलेंडर गेल्या ७० वर्षांमध्ये झालेल्या सगळ्या संशोधनाला एकत्र करून बनविलेले आहे. काही माशांच्या विणीच्या हंगामांबद्दल पुरेसे संशोधन झालेले नाही. आमचे कॅलेंडर माहिती छापील स्वरूपात उपलब्ध असण्यावर अवलंबून आहे. जर एखाद्या माशाच्या विणीच्या हंगामाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसेल तर आमचे कॅलेंडर अचूकपणे तो मासा खा कि टाळा ते सुचवू शकत नाही. अशा वेळी आम्ही दिलेला विणीचा हंगाम आणि लोकांच्या लक्षात आलेले माशाच्या गाभोळीचे महिने ह्यामध्ये विसंगतता असू शकते

 

पण तुम्ही आम्हाला ह्या विसंगती दूर करण्यास मदत करू शकता. तुम्हाला जर माशांमध्ये अंडी दिसली तर आम्हाला जरूर कळवा.

Q.

मासे खाणे सोडून देणे हाच समुद्री पर्यावरण रक्षणाचा सर्वोत्तम उपाय नाही का?

A.

आम्हाला हा प्रश्न नेहमी विचारला जातो. आमचे कॅलेंडर बनविण्या आधी आम्ही ह्या प्रश्नाचा खोलवर विचार केला. वैयक्तिक दृष्ट्या मासे खाणे सोडून देणे हा समुद्री पर्यावरणावर आपला वैयक्तिक वाईट परिणाम कमी करण्याचा करण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. पण मासे खाणे सोडून देणे हा सार्वजनिक धोरणाचा भाग होऊ शकतो का? किंवा ह्या विचारसरणीचा प्रचार व प्रसार केला पाहिजे का? असे प्रश्न उभे राहतात. ह्या प्रश्नांबद्दलचे आमचे विचार आम्ही येथे मांडले आहेत. 

 

आज मासे हा करोडो भारतीयांच्या आहाराचा भाग आहे आणि मासेमारी हे लाखो भारतीयांच्या उपजीविकेचे साधन आहे. जर आपण मासे खाणे सोडून देण्याला प्रोत्साहन देणार असू तर खालील प्रश्नाचा विचार करायला हवा 

१. ज्या लोकांचा मासे हा आहाराचा भाग आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे इतर पर्याय उपलब्ध आहेत का ?

२. हे पर्याय समुद्राशी संबंधित आहेत कि जमिनीशी संबंधित ?

३. जर हे जमिनी संबंधित पर्याय असतील आणि त्यांचे विस्तृतीकरण जरुरीचे असेल तर त्याचा जमिनीवरील परिसंस्थेवर (जंगले, झाडे, माळराने, वन्य पशु ,पक्षी, मृदा इत्यादी) काय परिणाम होईल. जमिनीवरील परिसंस्थेनवर सुद्धा हल्ली संकटात आहेत. असे असताना त्या अशा प्रकारचे विस्तृतीकरण सहन करू शकतील का ?

३. मासेमारीवर उदरनिर्वाहाच्या दृष्टीने, सांस्कृतिक दृष्टीने अवलंबून असणाऱ्या सामाजिक घटकांवर मासेमारी बंद होण्याने काय परिणाम होईल? 

 

आम्ही ह्या प्रश्नांची उत्तरे विविध विषयातील साहित्यात शोधायचा प्रयत्न केला. पण आम्हाला ह्या प्रश्नमाद्द्ल समाधानकारक संशोधन कुठे आढळले नाही. जर तुम्हाला ह्या विषयांबद्दलचे काही संशोधन आणि साहित्य माहित असेल तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही ह्याबद्दल नक्कीच विचार करू. 

 

मासे खाणे सोडून देण्याच्या विचारामागे एक नैतिक मुद्दा सुद्धा आहे. आणि तो म्हंणजे प्राणिमात्रांच्या संवेदनांचाआदर करणे. खरे तर कुठलेही  मानवी क्रियेमुळे कुठल्याही मानवेतर (प्राणी, पक्षी, वनस्पती इत्यादी) जीवावर कुठल्याही प्रकारची इजा, वेदना किंवा अनैसर्गिक बदल होऊ नयेत. पण काही मूलभूत जैविक बंधनांमुळे मानवाला मानवेतर जीवांवर अवलंबून राहण्यावाचून इलाज नाही आहे. अशा परिस्थितीत जेंव्हा आम्ही विविध मानवी आहार आणि ते आहार मिळविण्याच्या विविध पद्धती (शेती, पशुपालन, शिकार) ह्यांचा विचार केला तेंव्हा कुठली एक पद्धत कुठल्या दुसऱ्या पद्धतीपेक्षा नैतिकदृष्ट्या उजवी आहे अशी मिमांसा करणे आम्हाला फार कठीण गेले. आणि असा निर्णय घेण्यास आम्ही असमर्थ आहोत असे आम्हाला कळून आले. 

 

वरील कारणांमुळे आम्हाला मासे खाणे बंद करणे पर्यावरणास संवर्धनास पोषक आहे किंवा नैतिकदृष्ट्या वरचढ आहे अशा कुठल्याच बाबतीत समाधानकारक उत्तर मिळाले नाही. म्हणून आंम्हाला मासे खाणाऱ्यांना माशांची जैवविविधता, त्यांच्या जगण्याच्या पद्धती ह्यांची ओळख करून देणे आणि आहारात ह्या गोष्टींचा विचार करून बदल करण्यास सुचवणे हे जास्त योग्य वाटले.

Q.

कॅलेंडर मध्ये सुचविलेल्या माशामध्ये गाभोळी आढळल्यास काय करावे?

A.

असे घडल्यास त्याची नोंद आपण इथे करू शकता. अशा प्रकारच्या नोंदीं वीणेच्या हंगामात होणारे बदलांचे आकलन करून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील . इतरांनी केलेल्या नोंदी देखील आपण येथे पाहू शकता.. आम्ही ह्या माहितीचा सतत अभ्यास करत आहोत. जर आमच्या सूचना आणि लोकांनी नमूद केलेल्या माहितीत वारंवार तफावत आढळत असेल तर आम्ही आमच्या कॅलेंडर मधील सुचनांमध्ये सुधार करू

bottom of page